JayKumar Gore on Teacher Satara | ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी घेतली शिक्षकांचीच शाळा!
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेनी घेतली शिक्षकांचीच शाळा! इंग्लिश मिडीयम शाळाचे पेव कुणामुळे फुटलेय; दीड लाख पगार घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या दाम्पत्याचा मुलगा इंग्लिश मीडियम शाळेत शिकतो...
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेनी एकप्रकारे शिक्षकांचीच शाळा घेतलीय. दीड लाख पगार घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या दाम्पत्याचा मुलगा इंग्लिश मीडियम शाळेत शिकतो आणि त्या इंग्लिश मीडियम मधील शिकवणाऱ्या मॅडमला पगार 12 हजार आहे असे म्हणत इंग्लिश मिडीयम शाळाचे पेव कुणामुळे फुटलेय असा सवालही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेनी उपस्थित केलाय. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने ३१ शिक्षिकांचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे बोलत होते.
सध्या इंग्लिश माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढला आहे . इंग्रजी आले पाहिजे मात्र आपली संस्कृती सोडून या गोष्टी होता कामा नये. आता इंग्रजी माध्यमाकडे ओढा का वाढला याचा विचार शिक्षकांनी करण्याची वेळ आली आहे. प्राथमिक शिक्षकांनी शाळेचा पट का कमी होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्या प्राथमिक शाळांचा पट जास्त आहे, अशा शाळांची यादी करून तिथला अभ्यास करणे गरजेचे आहे. शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही; मात्र शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण सोडू नये, असे गोरे यांनी यावेळी आवाहन केले.